Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथे तब्बल १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभमेळा सुरू असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवली आहे. महाकुंभमेळ्यासाठी संत-महंत-साधू यांपासून ते देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशात आले आहेत. या महाकुंभमेळ्यात जवळपास ३० ते ४० कोटी जण सहभागी होऊ शकतात, असा कयास आहे. यातच आता वेळेत मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे हार्टअटॅक आलेल्या १०० जणांचे प्राण वाचले असून, ५८० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे. १,७०,७२७ ब्लड टेस्ट करण्यात आल्या आहेत आणि १,००,९९८ लोकांनी ओपीडी सेवांचा लाभ घेतला आहे. महाकुंभ मेळ्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या १०० हून अधिक भाविकांचा जीव वाचवण्यात आला आहे. तर १८३ गंभीर आरोग्याविषयी समस्या आलेल्यांवर आयसीयूमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. तसेच ५८० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती महाकुंभ मेडिकल व्यवस्थेचे अधिकारी डॉ. गौरव दुबे यांनी दिली.
रुग्णांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर
जनरल मेडिसीन, डेंटल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, स्त्रीरोग, बालरोग आणि बालकांच्या आजारांसंबंधी तज्ज्ञांसह इतर अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देत आहे. गंभीर प्रकरणांसाठी रुग्णालयात १० खाटांचे आयसीयू उभारण्यात आले आहे. रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील दोन भाविकांना छातीत दुखू लागले त्यानंतर त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. फुलापूर येथील हनुमानगंजचे रहिवासी १०५ वर्षीय बाबा राम जाने दास यांच्या पोटदुखीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहितीही देण्यात आली.