- शीलेश शर्मा, नवी दिल्लीसमाजवादी पार्टीत चालू असलेल्या महाभारतामागचे कारण समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्रप्रेम होय. आपला मुलगा प्रतीक याला मुलायमसिंह यांचा उत्तराधिकारी करण्याची साधना यांची इच्छा आहे. शिवपाल यांचा अखिलेश यांना विरोध असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवपाल आणि अखिलेश विरोधी गटाकडूनही साधना गुप्ता यांच्या इच्छेला पाठबळ मिळत आहे.मात्र, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार (पीई-२ ए-२००७), प्रतीक हे मुुलायमसिंह यांचे चिरंजीव नाहीत. प्रतीकचे पिता चंद्रप्रकाश गुप्ता आहेत. ते साधना यांचे पती होते. १९९० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. प्रतीक हा मुलायमसिंह यांचाच पुत्र असून, त्याला अखिलेशसारखाच दर्जा मिळावा, असा दावा तेव्हापासून प्रतीक आणि साधना करीत आहेत. तथापि, अखिलेश हे वडिलांवर नाराज आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, आपल्या आईला बेदखल करून, साधना गुप्ताला मुलायमसिंह महत्त्व देत आहेत. साधनांमुळेच मुलायमसिंह हे अखिलेश यांची आई मालतीदेवी यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते. २००३ मध्ये मालतीदेवी यांचे निधन झाले. त्यानंतर, साधना यांनी मुुलायमसिंह यांच्यावर वर्चस्व मिळविले. मुलायमसिंह यांचे निकटवर्तीय सांगतात की, साधनांच्या इशाऱ्यावर मुलायमसिंह वागू लागले, तसेच प्रतीकनेही निर्णयात दखल देणे सुरू केले. हे अखिलेश यांना मान्य नव्हते. असा झाला उलगडा प्रकरणाचा उलगडाअॅड. विश्वनाथ चतुर्वेदी यांच्या तक्रारीवर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सीबीआयने मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी चौकशी सुरू केली, तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. सर्व नोंदणीकृत दस्तावेज तपासल्यानंतर, प्रतीक याचे वडील चंद्रप्रकाश गुप्ता असल्याचे समोर आले. तथापि, प्रतीक हा मुलायमसिंह यांचाच मुलगा असल्याचे साधना गुप्ता सांगत होत्या. त्यांची नजर मुलायमसिंह यांच्या संपत्तीवर, तसेच मुलायमसिंह यांचा उत्तराधिकारी म्हणून प्रतीक याला दर्जा मिळविण्यावर होती. अखिलेश यांच्या विरुद्ध असलेल्या प्रत्येकाशी त्या संपर्क राखून डावेपच आखत होत्या.आरटीआय कार्यकर्ते विश्वनाथ चतुर्वेदी यांनी या तथ्याला दुजोरा देत सांगितले की, मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी सीबीआयने केलेल्या चौकशीतून प्रतीक हा मुलायमसिंह यांचा मुलगा नाही, यासह अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.
दुसऱ्या पत्नीमुळे सपात महाभारत
By admin | Published: October 25, 2016 4:56 AM