आज पहाटे मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान अचानक आग लागली. या घटनेत १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असल्याने, जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही आग कशी लागली याबाबत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
इंदूरमध्ये आचारसंहितेदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई; व्यावसायिकाच्या गाडीतून 56 लाख जप्त
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात आरती सुरू असताना अचानक आग लागल्याचे दिसत आहे. गर्भगृहात भस्म आरतीच्या वेळी होळी खेळली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अचानक गुलाल उडतो आणि आग भडकते. या घटनेनंतर गोंधळ उडाला असून ते ठिकाण तातडीने रिकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आरतीदरम्यान गुलाल उधळल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी गर्भगृहात आरती करत असताना मागून कोणीतरी पुजारी संजीव यांच्यावर गुलाल उधळला. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात असलेल्या रसायन असल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. गर्भगृहातील चांदीच्या आवरणाला रंगापासून वाचवण्यासाठी अंबाडी लावली जात असे. यामुळेही आग लागली. काही लोकांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेल्या पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत.