महाकौशल : दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:19 AM2018-11-15T07:19:58+5:302018-11-15T07:20:31+5:30
भाजपाला बंडखोरांकडून घरचा अहेर; कमलनाथ यांच्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह, मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा काँग्रेसमध्ये
गजानन चोपडे
जबलपूर : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या महाकौशल क्षेत्रात यंदा पक्षाला बंडखोरांनीच घरचा अहेर दिला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे संजय सिंग यांनी काँग्रेसशी घरोबा करीत थेट सीएम हाऊसलाच धक्का दिला आहे. काँग्रेस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महाकौशल क्षेत्रातील असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे मेव्हणे संजय सिंग यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी कमलनाथ यांच्यावर विश्वास दाखवीत काँग्रेस प्रवेश केला. त्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांवर आगपाखडही केली. काँग्रेसने संजय सिंग यांना बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष धीरज पटेरिया जबलपूरमधून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. आप्तांना पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपचे काही माजी केंद्रीय मंत्रीदेखील नाराज आहेत. एकंदरीत महाकौशल क्षेत्रात भाजपला निवडणुकीचा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही.
मागील निवडणुकीत महाकौशलच्या ३८ जागांपैकी २५ जागांवर भाजपला यश मिळाले होते तर काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याकडे सोपविल्याने ओहोटी लागलेल्या पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचा दावा काँग्रेस गोटातून केला जात आहे. अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांना मतदार संघातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. कमलनाथ छिंदवाडा तर राकेश सिंग जबलपूर येथील असल्याने महाकौशल क्षेत्रातील जागा दोघांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार राकेश सिंग यांचा बहुतांश वेळ पक्षांतर्गत बंडखोरांची समजूत घालण्यातच जात आहे.
अॅट्रॉसिटी अॅक्टमधील संशोधनानंतर त्याविरुद्ध दंड थोपटून गांधी जयंतीदिनी सपॉक्स समाजवादी पक्षाच्या स्थापनेने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढविली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १६ नोव्हेंबर रोजी महाकौशल क्षेत्राचा दौरा करणार आहेत. भाजपच्या रथाचे सारथ्य तूर्त मुख्यमंत्र्यांच्याच हाती आहे.
तीन मंत्रीही अडचणीत
ओमप्रकाश धुर्वे (शहपुरा), संजय पाठक (विजयराघवगड) आणि शरद जैन (जबलपूर मध्य) या तीन मंत्र्यांनाही मतदारसंघातच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. खा. फग्गनसिंग कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल या माजी केंद्रीय मंत्र्यांकडूनही पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र फग्गनसिंग कुलस्ते यांचे नातेवाईक कमल मरस्कोल्हे यांना सिवनी जिल्ह्यातील बरघाट मतदार संघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने कुलस्ते नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मरस्कोल्हे यांचे नाव पहिल्या यादीत होते. परंतु ऐनवेळी बी फार्म दुसऱ्याला देण्यात आला.