प्रयागराज - सध्या देशात महाकुंभ २०२५ मेळा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं सुरू आहे. त्यात सोशल मीडियावर हर्षा रिछारिया नावाच्या तरुणीने चांगलीच हवा केली आहे. हर्षा एक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. गेल्या २ वर्षापासून ती साध्वी बनली आहे. गुरू आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरी महाराज आणि निरंजनी आखाडाशी हर्षा जोडली गेली आहे. परंतु हर्षासारखीच आणखी एक महिला साध्वी तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध झाली आहे तिचं नाव आहे भगवती सरस्वती.
साध्वी भगवती सरस्वती मूळची लॉन्स एंजिल्समध्ये राहणारी आहे. तिने स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतले. मागील ३० वर्षापासून ती ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमात राहतेय. अलीकडेच ती प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात पोहचली. साध्वी भगवती सरस्वती सांगतात की, संगममध्ये पवित्र स्नान करण्याची ही संधी नाही तर त्यांच्या भक्तीत श्रद्धेची डुबकी लावण्याची संधी आहे. ही भारतीय संस्कृती आणि वारसा याची महानता दाखवते. हा कुठलाही रॉक कॉन्सर्ट अथवा कुठल्याही खेळाचे आयोजन नाही असं त्यांनी सांगितले.
१९९६ मध्ये भारतात आली...
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात साध्वी भगवती सरस्वती यांचा जन्म झाला. १९९६ साली भारतात पर्यटनासाठी आलेल्या भगवती यांच्यावर भारतीय संस्कृती आणि इथल्या प्रथा परंपरेचे छाप पडली. त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी घर कुटुंब सोडून सन्यास ग्रहण करण्याचा निर्णय घेतला. ऋषिकेशच्या गंगा किनारी असलेल्या परमार्थ निकेतन आश्रमात त्यांनी आश्रय घेतला. भगवती सरस्वती यांनी मानसोपचारात पीएचडी धारण केलं आहे. त्या डिवाइन शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत त्याशिवाय ऋषिकेश इथं महिला सशक्तीकरणाचं त्या काम करतात.
दरम्यान, अमेरिकेतून भारतात येण्यापूर्वी त्यांना अमेरिका आणि भारतीय लोकांच्या मानसिकतेत मोठं अंतर दिसले. अमेरिकेतली लोक तक्रारी जास्त करतात, प्रत्येकजण तक्रारच करत राहतो मग ते पैशाचं प्रकरण, आरोग्याशी निगडीत विषय असो..भारत त्यापेक्षा वेगळा आहे. इथले लोक परामात्मावर भरवसा ठेवतात. तक्रारीपासून लांब राहतात असंही साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटलं.