Mahakumbh Mela 2025 :बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताने लिहिलेल्या या पत्रावर ते इतर सनातनी धर्मगुरूंच्या स्वाक्षऱ्या घेत आहे. कारण, मोठ्या पाठिंब्यासह ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचू शकेल.
महाकुंभ मेळ्यादरम्यान श्री दुधेश्वरनाथ मठ शिबिरात यति नरसिंहानंद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांना पत्र लिहून बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदूंना वाचवण्यासाठी लष्करी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, असे यति नरसिंहानंद म्हणाले. तसेच, या पत्रावर प्रथम श्रीमहंत नारायण गिरी महाराज यांनी स्वाक्षरी घेण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही यति नरसिंहानंद यांनी सांगितले.
कोण आहेत यति नरसिंहानंद?मीडिया रिपोर्ट्सनुसार, यति नरसिंहानंद यांचे खरे नाव दीपक त्यागी आहे. त्यांनी अभियंता म्हणून काम केले आहे. त्यांनी रशियामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि ब्रिटनसह इतर काही देशांमध्येही काम केले. यानंतर ते भारतात परतले. यानंतर ते 'हिंदू स्वाभिमान' नावाची संघटना देखील चालवतात. तसेच, हिंदू तरुणांना आणि मुलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी 'धर्म सेना' ही संघटना देखील स्थापना केली. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेतगेल्या वर्षी २९ सप्टेंबरला यती नरसिंहानंद यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच, अनेक राज्यांमध्ये यति नरसिंहानंद यांना अटक करण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह वक्तव्यांशी त्यांचे जुने नाते आहे. विशेषत: मुस्लीम समुदायाविरोधात त्यांनी अनेकवेळा चिथावणीखोर वक्तव्यं केली आहेत.