सांगली : श्रवणबेळगोळ (जि. हसन, कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान श्री बाहुबली स्वामी मूर्तीचा दर १२ वर्षांनी होणारा महामस्तकाभिषेक महोत्सव पुढील वर्षी ७ ते २६ फे ब्रुवारी २०१८ या दरम्यान होणार आहे. महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या राष्ट्रीय समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी शनिवारी ही माहिती दिली. ५७ फुटी अखंड पाषाणातील या मूर्तीचा महामस्तकाभिषेक २००६ मध्ये झाला होता. या महोत्सवाचा तपशील स्वतिश्री चारूकीर्ती भट्टारक स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली पूजा समितीने ठरविला आहे. पुढील वर्षी ७ फेब्रुवारीला महोत्सवास सुरुवात होणार असून, दररोज मांगलिक धार्मिक विधी, रथयात्रा, पालखी मिरवणूक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ८ फेब्रुवारी ते १६ पर्यंत पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व विविध आराधना पूजा, शनिवार, १७ ला १०८ कलशाने प्रथम महामस्तकाभिषेक, रविवार, १८ ला १००८ कलशाने द्वितीय महामस्तकाभिषेक, तर १९ ते २५ फेब्रुवारीपर्यंत दररोज १००८ शुध्द जलाने भरलेल्या कलशाने अभिषेक होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या महामस्तकाभिषेकासाठी नारळपाणी, उसाचा रस, दूध, श्रीगंध, चंदन, हळद, अष्टगंध, पुष्पवृष्टी आदी अष्टद्रव्यांनी महाभिषेक होणार आहे. सोमवार, २६ फेब्रुवारीला समारोप होणार आहे. विश्वशांती, लोककल्याणासाठी अहिंसेचा संदेश प्रसारित करणे याबरोबरच वर्षभरामध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होणार आहेत. यात संस्कृत संमेलन, कन्नड संमेलन, महिला संमेलन, पत्रकार संमेलन, विद्धवत संमेलन, युवा संमेलन यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)५७० कोटींची विकासकामे : दर बारा वर्षांनी होणारा गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव हा जैन धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा महोत्सव असतो. यासाठी सरकारकडूनही ५७० कोटींची विकासकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रवणबेळगोळला पुढील वर्षी महामस्तकाभिषेक
By admin | Published: January 22, 2017 12:32 AM