नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिर बांधणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ च्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत महंत नृत्यगोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर चंपत राय यांना या ट्रस्टचे सरचिटणीस बनवण्यात आले आहे. तसेच नृपेंद्र मिश्रा यांना मंदिर निर्माण समितीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत अन्य ९ प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक आज दिल्लीतील ग्रेटर कैलाश-१ येथील ट्रस्टच्या कार्यालयात झाली. हे कार्यालय ज्येष्ठ वकील के. परासरण यांच्या निवास्थानी बनवण्यात आले आहे. परासरण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर चंपत राय यांनी सांगितले की, नृत्यगोपाल दास यांची अध्यक्षपदी आणि चंपत राय यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच गोविंद गिरी यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे.
राम मंदिर निर्मितीसाठी भवन निर्माण समिती स्थापन करण्यात येईल. त्यासाठी कार्यवाही केली जाईल. नृपेंद्र मिश्रा यांना भवन निर्माण समितीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे.