वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून लढवणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, मोदी वाराणसी येथून लढणार याची भाजपाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी त्यांना घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसकडून मोदींविरोधात स्थानिक लोकप्रिय चेहरा मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदींविरोधात संकटमोचन मंदिराचे महंत प्राध्यापक विश्वंभर नाथ मिश्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच मिश्रा यांना सपा आणि बसपाकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यावर ते वाराणसीवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. आपण देशाचा पंतप्रधान निवडणार असल्याने वाराणसीमधील मतदारांमध्ये उत्सुकता होती. मात्र त्यावेळीही अरविंद केजरीवाल यांनी मोदींना आव्हान दिल्याने लढत तुल्यबळ झाली होती. बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक विश्वंभर नाथ मिश्रा यांची प्रतिमा सर्वधर्मसमभाव मानणारे अशी आहे. समाजातील प्रत्येक वर्गामध्ये त्यांचा संपर्क आहे. तसेच गंगेच्या स्वच्छतेबाबत सुरू असलेल्या मोहिमेमध्ये प्राध्यापक विश्वंभर नाथ मिश्रा हे अग्रणी राहिले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारा का अशी विचारणा केली असता त्यांनी चर्चा तर मीसुद्धा ऐकत आहे. पण मी सध्यातरी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केलेली नाही, असे सांगितले.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना संकटमोचन मंदिराचे महंत देणार आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 1:03 PM