मागच्या दहा वर्षांपासून दिल्लीमध्ये सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाला रविवारी मोठा धक्का बसला होता. दिल्लीतील सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रिपदासह आम आदमी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. दरम्यान, आम आदमी पक्ष सोडल्यानंतर कैलाश गहलोत हे आज भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कैलाश गहलोत हे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. कैलाश गहलोत यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहून पक्ष सोडण्याच्या कारणांचा पाढा वाचला होता. त्यात ते म्हणाले की, नव्या बंगल्यासारखे अनेक अजब आणि लाजिरवाणे वाद झाले आहेत. ते आम्ही अजूनही आम आदमी असण्याबाबत संशय निर्माण करत आहेत. दिल्ली सरकार आपला बहुतांश वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यामध्ये घालवत राहिलं तर दिल्लीची प्रगती होणार नाही. त्यामुळे माझ्याजवळ आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे कैलाश गहलोत यांनी सांगितले.
कैलाश गहलोत यांनी आम आदमी पक्षावर गंभीर आरोप करताना सांगितले की, आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे लोकांच्या अधिकाऱ्यांसाठी लढण्याऐवजी आम्ही केवळ राजकीय अजेंड्यासाठी लढत आहोत. त्यामुळे दिल्लीच्या लोकांना पायाभूत सेवा देण्यात अडचणी येत आहेत. मी आपली राजकीय यात्रा कायम ठेवू इच्छितो. त्यामुळेच माझ्याजवळ कुठल्याही पक्षापासून वेगळं होण्यापासून पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा कैलाश गहलोत यांनी केली आहे.