Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही जाते. योगी आदित्यनाथ यांच्या सभांना राज्यात प्रचंड गर्दी जमायची. अनेक उमेदवार त्यांच्या सभेची मागणी करायचे. विशेष म्हणजे, त्यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' सारख्या वक्तव्यांनी हिंदू मतदार एकवटला आणि भाजपचा मतदानाचा टक्का वाढला. याबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री योगींच्या सभांचा फायदाचंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा आम्हाला खूप फायदा झाला. योगी आदित्यनाथ यांच्या सभांची राज्यात एवढी मागणी होती की, ती मागणी आम्ही पूर्ण करू शकलो नाही. दरम्यान, सज्जाद नोमानी यांच्या फतव्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणुकीत अशा प्रकारे धार्मिक घोषणा करणे कोणत्याही धर्मासाठी योग्य नाही. अशा लोकांना जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करायचे असते. अशा विधानांनी आम्हाला त्रास होत नाही.
भाजपची नवीन मोहिम...दरम्यान, भाजपने विधानसभा निकालानंतर आता सभासद मोहिम हाती घेतली आहे. बावनकुळे म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख नवीन सभासद जोडण्याचे लक्ष ठेवले आहे. आज महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक बैठक जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. निवडणुका संपल्यामुळे सभासद अभियानांतर्गत नवीन 1 कोटी 51 लाख सभासद जोडण्याचे लक्ष ठेवले आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या सदस्यत्व अभियानात सहभागी होण्याचे आवाहनदेखील केले. बावनकुळे यांनी विशेषत: समाजसेवा आणि धार्मिक क्षेत्राशी निगडित लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
महायुतीला प्रचंड बहुमतविधानसभा निवडणुकीत महायुतीने 230+ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले. भाजपने 132, शिवसेना शिंदे गट 58 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीला फक्त 47 जागा जिंकता आल्या. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतरांना 12 जागा मिळाल्या आहेत.