“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:50 PM2024-11-19T17:50:10+5:302024-11-19T17:52:12+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनतेचे पैसे लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले? अशी विचारणाही राहुल गांधी यांनी केली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp rahul gandhi asked question to pm modi over money distribution allegations on vinod tawde | “५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल

“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले होते, असा मोठा आरोप बविआने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाली आहे. तसेच अनेक डायऱ्या मिळाल्या आहेत, ज्यात व्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तब्बल चार तासांनी विनोद तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर एकाच कारमधून बसून बाहेर पडले. या प्रकरणी राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे. 

या संदर्भात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपा उमेदवार राजन नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच विनोद तावडे ५ कोटी घेऊन येत आहेत, हे भाजपावाल्यांनीच मला सांगितले. मला वाटले की, विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असे छोटे काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते. विनोद तावडे मला सारखे फोन करत होते. मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत होते. विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. यावर आता राहुल गांधी एक्सवर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला आहे. 

मोदीजी, ५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेली पोस्ट शेअर केली आहे. तसेच कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला आहे. मोदीजी, हे ५ कोटी रुपये कोणाच्या सेफमधून बाहेर आले? जनतेचे पैसे लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. तर, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे वाटपासंदर्भातील अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपाचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी पोस्ट काँग्रेसने केली आहे. हीच पोस्ट राहुल गांधी यांनी त्यांच्या हँडलवर शेअर केली आहे. 

दरम्यान, विनोद तावडे हॉटेलमध्ये असून, पैसे वाटप करत असल्याची बातमी पसरताच ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घातला. हॉटेलमधील एका रुममधून ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच एक डायरीही सापडली. ही डायरी विनोद तावडे यांचीच असून त्यामध्ये १५ कोटी रुपयांचा उल्लेख असल्याचा आरोप बविआचे नेते क्षितीज ठाकूर यांनी केला आहे.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp rahul gandhi asked question to pm modi over money distribution allegations on vinod tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.