“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:57 PM2024-11-28T20:57:50+5:302024-11-28T20:59:57+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएमबाबत लोकसभा आणि विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत, असे काँग्रेस खासदारांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, भाजपाकडून अद्याप याबाबत कोणत्याही निर्णय झालेला नाही. भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार की, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असणार आहेत. यावरून आता काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे.
याच गोष्टीचे आश्चर्य वाटते की, पूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय व्हायचे. पण आता नवीन परंपरा सुरू झालेली आहे. दिल्लीत निर्णय होतात. दिल्लीतील दोन नेते सांगतात, ते मान्य असेल, ही भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री सांगत आहेत. मी हताश नाही, निराश नाही, असे बोलत असले, तरी चेहरा मात्र काहीतरी वेगळेच सांगत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर अजूनही सरकार स्थापन झालेले नाही, हे पहिल्यांदाच आम्ही पाहतोय. सरकार कधी स्थापन होणार, याकडे १३ कोटी जनतेचे लक्ष लागले आहे. स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ लागत असेल, तर ही हताश करणारी गोष्ट आहे, अशी टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा
अजित पवार अनेक वर्षे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद सांभाळत आहेत. अजित पवार सातत्याने याच पदांवर राहिलेले आहेत. आताही अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्रीच होणार, हे स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी वेगळा अनुभव कधीतरी अनुभवावा. अजित पवार यांना शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला वर्षा गायकवाड यांनी लगावला. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना, परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. सध्यातरी आम्ही एकत्र आहोत. वैयक्तिक कोणाची मते काय आहेत, यापेक्षा पक्षाचे मत काय आहे, ते महत्त्वाचे ठरते. शिवसेना ठाकरे गट सोबत असावा, आमची काही हरकत नाही. संघटना म्हणून आम्ही एकत्र काम केले आहे. येणारा काळ ठरवेल. काळ ठरवेल, तो निर्णय मान्य, असे गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, ईव्हीएमबाबत लोकसभा आणि विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीही आम्ही प्रश्न मांडले होते. या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही आत्मचिंतन करत आहोत. मायक्रो मॅनेजमेंटवर येणाऱ्या काळात काम करणार आहोत. ईव्हीएम हा आजचा विषय नाही, तो सातत्याने आम्ही मांडत आहोत. आमच्या नेत्यांनी याबाबत जी भूमिका मांडली, त्याच्याशी सहमत आहोत, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.