नवी दिल्ली- मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळही केली आहे. सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप त्यांना आरक्षण मिळालेलं नाही. त्याच विषयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावा. सत्तेवर येण्याआधी फडणवीस सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मोठमोठ्या बाता मारत होते. परंतु सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळालं नाही. फडणवीस सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून सातारा, पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली आहे.