नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होतोय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघांनी नकार दिला. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
मंत्रिमंडळात खातेवाटपावरून विविध चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फडणवीसांना कुठले खाते मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीसांना गृहखाते मिळणार असल्याचं जवळपास कन्फर्म झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार लांबणार नाही असं दिल्लीतून सांगण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असेल याबाबत अनेक नावं आघाडीवर आहेत.
याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार का? अशी चर्चा होती. कारण एकदा मंत्री झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद पाटलांना सोडावं लागेल. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू होईल. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर सोपवली जाईल यावर खलबतं सुरू झालीत. सुप्रीम कोर्टाची सुनावणी ८ ऑगस्टऐवजी आता १२ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही लांबणार का असं विचारलं जात होतं. परंतु सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्तार याचा संबंध नाही असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्पष्ट करत आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं दिल्लीतील वर्तुळात चर्चा आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नाही, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा अनेकजण करत आहेत. यासंबंधी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, कोण काय म्हणते याला काही महत्त्व नाही. त्यावर उत्तरे द्यायला मी काही रिकामटेकडा नाही. परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्त्व असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.