मुंबई : भाजपपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. काल शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ९ मंत्र्यांचा आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी गुवाहाटीला दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.
अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेत उभी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड पुकारत आपल्यासोबतच्या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेले होते. तिथे काही दिवस प्रचंड अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीची पूजा केली होती. त्यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार देखील होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आता पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यापूर्वी शिवसेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही बंधू एकाचवेळी विधानसभेत आपले नशीब आजमावतील. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ही जागा रवी राणा यांच्या पक्षाला हवी होती, मात्र शिंदे सेनेने तिथे अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेला पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना भायखळा इथून तर खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वेतून तिकीट देण्यात आले आहे. या यादीत तीन महिलांचा समावेश आहे.