नवी दिल्ली : ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हा पांडुरंगाचे महिमान सांगणारा अभंग तसेच ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ , ‘रामकृष्णहरी’ या नामघोषाच्या निनादात समृद्ध वारकरी संत परंपरा दाखवणारा महाराष्ट्राचा चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला. महाराष्ट्राच्या मुलीने एनसीसी पथकाचे केलेले नेतृत्वही खास ठरले.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेट शेजारील युद्ध स्मारकावर सदैव तेवत असलेल्या ‘अमर जवान ज्योती’वर देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व त्यासोबतच २१ तोफांची सलामी देण्यात आली.
यावर्षीच्या पथसंचलनात आपल्या शेजारील बांगलादेशच्या सैन्य तुकडीचे संचलनही खास ठरले. भारत व बांगलादेशदरम्यानच्या सामरिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने बांगलादेशची सैन्य तुकडी व सैन्य बॅण्ड या पथसंचलनात सहभागी झाला व त्यांनी उत्तम प्रस्तुती दिली. सेनेचे अश्वदल, रणगाडे, मिसाईल, रडार, युद्धक टँक तसेच लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथसंचलन आणि बॅण्ड पथकांची आकर्षक पेशकश उपस्थितांचे आकर्षण होते. वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवत समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संत परंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आसनस्थ मूर्ती, मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे फिरते पुतळे विलोभनीय ठरले. पांडुरंगाची कटेवर हात असणारी मूर्ती, महाराष्ट्रासह १७ राज्यांचे ९ केंद्रीय मंत्रालयांचे आणि ६ सैन्य दलाच्या अशा एकूण ३२ चित्ररथांनी पथसंचलन केले.
पथसंचलनात महाराष्ट्राच्या लेकीची चमकदार कामगिरीया पथसंचलनात मुलींच्या एनसीसी पथकाचे नेतृत्व महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाच्या सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत हिने केले. समृद्धीचे दमदार पथसंचलन व तिने मुख्य कार्यक्रमस्थळी देशाच्या तिरंग्यास व राष्ट्रपती महोदयांना दिलेली मानवंदनाही महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचविणारी ठरले. देशाच्या सरंक्षण सज्जतेत भर टाकणाऱ्या राफेल लढाऊ विमानाचा विशेष सहभाग असलेली भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग पासही खास ठरली. हेलिकॉप्टर्सवर भारतीय तिरंग्यासोबत तीन सेनादलांचे झेंडेही फडकताना दिसून आले. कार्यक्रमाचा समारोप होताच शांतीचा संदेश देणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांनी राजपथावरील आसमंत भरून गेला होता.
वारकरी संत परंपरेचे प्रभावी दर्शनया पथसंचलनात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सुंदर व सुबक चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला.
‘संतवाणी’ ग्रंथही ठरला शोभनीय चित्ररथाच्या दोन्ही बाजूंनी संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उठून दिसत होत्या. आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत संयोजन केलेल्या अभंग व नामघोषाच्या तालावर वारकऱ्यांच्या वेशात मृदंग, टाळ आणि वीणाधारी चार कलाकारांनी चित्ररथावर प्रस्तुती दिली. तसेच चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूलाही कलाकारांनी वारकऱ्यांच्या भूमिका साकारल्या होत्या .