नवी दिल्ली - शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे शुक्रवारी रात्री राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असतानाच अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरवर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जोरदार धक्का दिला आहे. भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खलबते सुरू असताना भाजपाने अनपेक्षित चाल खेळत या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिला आहे. या सर्व खेळाचे अर्थातच सुत्रधार होते ते भाजपाध्यक्ष अमित शहा. राज्यातील राजकीय परिस्थितीवर फार भाष्य न करणाऱ्या अमित शहा यांनी अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले.
दरम्यान, राज्यातील या घडामोडीनंतर अमित शहा यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला होता. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी "मी शांत बसलोय, म्हणजे काहीच करत नाही आहे? असे उद्धव ठाकरे यांना वाटते का? असे सूचक विधान केले होते. मात्र त्यावेळी या विधानाकडे फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण अमित शाह यांनी कुशल रणनीती आखत हा इशारा खरा करून दाखवला.
सर्व राजकीय अंदाजांना धक्का देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या घडामोडींनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.