नवी दिल्ली: शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार अशा घडामोडी सुरू असतानाच आज राजभवनातून मोठी घडामोड समोर आल्याने सर्वांना धक्काच बसला. भाजपाने सत्तास्थापेसाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व अचानक झालेल्या राजकीय नाट्यानंतर काँग्रेसने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका करत एका तासात सर्व आमदारांच्या सह्यांची पडताळणी कशी करण्यात आली असं सांगत विविध प्रश्न उपस्थित केले आहे.
काँगेसचे नेते अहमद पटेल यांनी 'महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने ही घटना लिहिली जाईल. काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी राज्यपालांनी दिलीच नाही. महाराष्ट्राची जनता ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. संविधानाची अवहेलना करून शपथविधी उरकण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही बैठका झाल्या. तसेच शपथविधीचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आमचे सर्व आमदार एकत्र आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने हा सगळा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बहुमताची चाचणी जिंकणार आहे' असं देखील अहमद पटेल यांनी म्हटलं होतं. त्यातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सूरजेवाला यांनी देखील या राजकीय नाट्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
रणदीपसिंह सूरजेवाला उपस्थित केलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहेत:
- राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली?
- केंद्र सरकारने राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कधी केली?
- राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस कधी स्वीकारली?
- राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं?
- मुख्य न्यायाधिशांना शपथविधीला बोलवण्यात आलं नाही?
- शपथविधी किती वाजता झाली? माध्यमांना का बोलवण्यात आलं नाही?
भाजपाला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून बहुमत सिद्ध करु, शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल, आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहणार, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ४ वाजता होणार आहे. त्यात नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.