CM Eknath Shinde Join NDA Meeting: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक UPA यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपविरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरूत असून, विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA ची एक बैठक दिल्लीत होत आहे. या दोन्ही बैठकांना दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनडीएमधील बैठकीसाठी दिल्लीत गेले असून, २०२४मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा NDAला बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एनडीएमध्ये ३८ घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पु्न्हा एकदा देशात एनडीएला बहुमत मिळेल. अजित पवार पक्षात आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्रात अजितदादा आणि त्यांचे सहकारी सोबत आल्याने ताकद वाढली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशात पुन्हा एकदा NDAला बहुमत मिळेल
एकीकडे विचारधारा असलेले संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक नेता ठरवू शकत नाहीत. २०२४मध्ये संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढे एनडीए बळकट होईल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, एनडीएच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजप तसेच मित्रपक्षाचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत.