नवी दिल्ली - राज्यातील सत्तानाट्यामध्ये राष्ट्रवादीचे बेपत्ता झालेले आमदार पुन्हा पक्षात परतत असल्याचं दिसून येत आहे. या बेपत्ता झालेल्या आमदारांपैकी एक असलेले नरहरी झिरवळ हेदेखील शरद पवारांच्या दिल्ली निवास्थानी पोहचले. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना धक्कादायक घटनाक्रम उघड केला.
यावेळी बोलताना आमदार नरहरी झिरवळ म्हणाले की, शुक्रवारी रात्री आम्हाला मुंडेच्या बंगल्यावरुन फोन आला, बैठकीसाठी सकाळी बोलविलं. सकाळी बंगल्यावर आम्ही गेलो, ५ मिनिटात आम्हाला गाड्यात बसविले, आम्हाला सांगण्यात आले की, अजितदादांना भेटण्यासाठी जायचं आहे, राजभवनात गेलो, तेव्हा भाजपाच्या नेत्यांना पाहून धक्का बसला, शपथविधी झाला, आम्हाला परत गाड्यात बसविले तिथून आम्हाला हरियाणाच्या एका हॉटेलला नेण्यात आलं. शरद पवारांना सांगूनच हे घडत आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र गैरसमजातून हा प्रकार घडला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शपथविधीचा कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्हाला कल्पना नव्हती, मला जे काही मिळालं आहे ते शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मिळालं. लोकांनी निधी जमा करुन मला निवडून आलं आहे. ते मला बघून नाही तर शरद पवारांना बघून मतदान करतात. माझ्या आई-वडिलांनंतर, गुरुजीनंतर मला मोठं करणारे शरद पवार आहेत. शरद पवारांचा विश्वासघात करणं म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं पाप असेल असंही नरहरी झिरवळ यांनी सांगितले.
दरम्यान, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मला ठेवण्यात आलं. आम्हाला सांगण्यात आलं की अजून आमदार येणार आहेत, शरद पवारांच्या सांगण्यावरुनच हे सुरु आहे आम्हाला असं सांगण्यात येत होतं. मुंबईहून काही कार्यकर्त्यांनी आम्हाला सोडविलं. कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या गराड्यात आम्हाला ठेवण्यात आलं होतं. आम्ही बाहेर निघण्याचे प्रयत्न सुरु होते. आम्ही पळून गेलो असं भासविण्यात आलं. शरद पवारांवरील निष्ठा कमी होणार नाही, माझी छाती फोडली तरी शरद पवारच दिसतील. ज्यांच्यावर निष्ठा ठेवली त्याचा विश्वासघात करणार नाही असं स्पष्टीकरण आमदार नरहरी झिरवळ यांनी दिलं आहे.
याबाबत बोलताना शिवसेना खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, दिशाभूल करुन आमदारांना फसविण्यात आलं. हॉटेलच्या बाहेरही पडता येत नव्हते, शरद पवारांना भेटून दिलं जात नव्हतं. जे आमदार गेलेत त्यांची निष्ठा शरद पवारांवर आहेत असं त्यांनी सांगितले.