दिल्लीत दखल... महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 09:07 AM2022-04-02T09:07:58+5:302022-04-02T09:08:46+5:30
सोनिया गांधी यांनी घेतली पत्राची दखल
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह आणि महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री बदलण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत; परंतु सूत्रांनुसार यासंबंधी अंतिम निर्णय काँग्रेसचे आमदार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या घेतील. याच आठवड्यात ही चर्चा होणार आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानुसार काँग्रेसच्या मंत्र्यावर पक्षाचे आमदार नाराज आहेत. कारण हे मंत्री छोटे नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा करतात. त्याचा परिणाम संघटनेवर होत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राज्यातील काही आमदारांनी पाठविलेल्या पत्रात काही निवडक मंत्र्यांबाबत तक्रार करण्यात आली आहे. या मंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असलेले जुने नेते सतीश चतुर्वेदी, विलास मुत्तेमवार, अनिस अहमद पुढाकार घेताना दिसत नाहीत. पक्ष नेतृत्वही आमच्या अनुभवाचा उपयोग करीत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.
विदर्भात पक्ष मजबूत करण्यासाठी हालचाली
n सतीश चतुर्वेदी हे मूूळचे उत्तर प्रदेशचे असून, ब्राह्मण समाजात त्यांचा प्रभाव आहे.
n उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांना पुढे करून फायदा घेता आला असता.
n काँग्रेस अध्यक्षांनी या सर्व तथ्यांची दखल घेतली आहे. त्या विशेषत: विदर्भात पक्ष मजबूत करण्याच्या इराद्याने काही मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत.