भाजपाकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी; बाळासाहेब थोरात यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 22:18 IST2019-07-23T22:17:46+5:302019-07-23T22:18:52+5:30
बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानं कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार पडलं

भाजपाकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी; बाळासाहेब थोरात यांची टीका
मुंबई: लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना आ. थोरात म्हणाले की, भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी शाह यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून पहात आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्रास सुरु आहे. गोवा, मणिपूर,अरुणाचल प्रदेश हीच निती वापरून भाजपने सत्ता मिळवली.
भाजपने काँग्रेस आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून व पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. ही लोकशाहीची गळचेपी असून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करून भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.