नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांकडून गुपित प्रचार सुरू असून गावोगावी-घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. हरयाणातील एका भाजपा उमेदवाराने ईव्हीएम मशिनसंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीश सिंह विर्क यांनी कमळालाच मतदान करण्याचं धमकीवजा आवाहन केलं आहे.
बख्शीशसिंह यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी बख्शीशसिंह यांनी ईव्हीएम मशिन सेट असल्याचाच सूचवलं आहे. मतदारांना आवाहन करताना, तुम्हीही कुठलंही बटन दाबा, मत कमळाचा पडणार असा दावा विर्क यांनी केला आहे. जर तुम्ही आज चूक केली, तर त्याची सजा तुम्हाला 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कुठं मतदान केलं, याची आम्हाला माहिती मिळेलच. जर तुम्ही म्हणाल तर तेही सांगू. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजरा तीक्ष्ण असून तुम्ही कुठेही मत द्या, भेटणार तर कमळालाच. तुम्ही कुठलेही बटन दाबा, मत तर कमळाच पडणार, आम्ही मशिन सेट केल्या आहेत, असे खळबळजनक विधान विर्क यांनी केलं आहे. दरम्यान, विर्क यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली असून भाजपाकडून ईव्हीएम सेट असल्याचा दावाच एकप्रकारे बख्शीशसिंह यांनी केला आहे.