महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस कार्यकारणीची बैठक संपली; शिवसेनेला मिळणार काँग्रेसचा 'हात'?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:26 PM2019-11-11T12:26:24+5:302019-11-11T12:27:21+5:30
कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.
दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेवर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.
याबाबत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. पुढील चर्चा राज्यातील नेत्यांसोबत होणार आहे. ४ वाजता बैठक होणार आहे. राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेणार आहे. त्यानंतर राज्यात कोणती भूमिका घेणार याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस हात देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Congress leader Mallikarjun Kharge after party's Working Committee meeting ends: We have called our Maharashtra leaders to Delhi for further discussions, the meeting will be at 4 pm. https://t.co/A95BwEaOW9pic.twitter.com/iMEFMsh8cD
— ANI (@ANI) November 11, 2019
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आक्रमक झाल्याने भाजपाला सत्तास्थापन करता आली नाही. तर जनतेच्या आदेशाचा अनादर करुन शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार बनवू इच्छिते त्यांना शुभेच्छा आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जर राज्यात महाशिवआघाडी असं नवीन समीकरण जुळून आलं तर राज्यात या तिन्ही पक्षाचं सरकार येईल तर भाजपा विरोधी बाकांवर बसेल असं वातावरण तयार झालं आहे.
आज संध्याकाळी ७.३० पर्यंत शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिली आहे. मात्र राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतलं पाहिजे. सरकार बनविणं आमचे कर्तव्य, जास्त मुदत मिळणे गरजेचे आहे. मात्र राज्याला राष्ट्रपती राजवटीपर्यंत ढकलायचं हे षडयंत्र रचलं जात आहे. ज्या घटनात्मक तरतूदीनुसार काम करता येईल ते करणार आहोत. आमच्या भूमिका राज्यपालांकडे मांडणार आहोत. शिवसेनेवर राज्यपालांनी सरकार बनविण्याची जबाबदारी निमंत्रण दिलं. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सरकार बसविण्याचा प्रयत्न करणार आहोत असं संजय राऊतांनी सांगितले आहे.
काँग्रेसच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.