पुणे - भारतीय हवाईदलाने मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिले राफेल लढाऊ विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचं स्पष्टीकरण माजी संरक्षणमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिलंय. तसेच, ही श्रद्धा असून अंधश्रद्धा नसल्याचंही सितारमण यांनी म्हटलं.
राजनाथ सिंह यांनी राफेलसमोर लिंबू ठेवले या मुद्द्यावर निर्मला सितारमण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांनी ओम लिहिला त्यात काय चुकीचे आहे? ही अंधश्रद्धा आहे? प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार काम करतो. पूर्वीचे संरक्षणमंत्री आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या धर्म पद्धतीने देशासाठी संरक्षण सामुग्री ताब्यात घेताना पूजा केली होती, असे म्हणत ए.के.अँटोनी यांचे नाव न घेता त्यांनी काँग्रेसच्या काळातील संरक्षणमंत्र्यांची आठवण करून दिली. तसेच, तेव्हा कोणी काहीही केल नाही, चर्चाही केली नाही, असे सितारमण यांनी म्हटले. ज्यांचा विश्वास आहे ते करतात, विजयादशमीला शस्त्रपूजा ही आपली संस्कृती आहे. त्यांनी परंपरा पाळली, त्यात काही चुकीचे नाही, असे म्हणत राजनाथसिंह यांच्या राफेल पूजनाचे आणि लिंबू ठेवण्याचे सितारमण यांनी समर्थन केलं आहे. कलम 370 हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा कसा होऊ शकतो का याबाबतही त्या म्हणाल्या की, हा देशाच्या सुरक्षिततेसाठी अतिमहत्वाचा मुद्दा आहे. फक्त महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे.प्रत्येक भारतीयाला त्याबद्दल अभिमान हवा. हा निर्णय झाल्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये तिथे एकही गोळी चालली नाही. तेथील वातावरण सुरळीत आहे. मात्र, आम्ही बेरोजगारी, आर्थिक मुद्दे याबाबतीतही तितकेच गंभीर आहोत. या दोन मुद्द्यांची बरोबरी होऊ शकत नाही. हा मुद्दा महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात कोणी घेतला, हे मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनीही या लिंबाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले की, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात नवीन लढाऊ विमान दाखल झाल्याचा मला आनंद आहे. मात्र जेव्हा राफेल खरेदी केले तेव्हा विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आले. मी जर एखादी नवीन गाडी घेतली असती तर लिंबू कापून त्याचे सरबत बनवून लोकांना पाजलं असतं असं सांगत सरकारच्या या कृतीवर निशाणा साधला.