मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून अखेर शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
रविवारी भाजपाने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणारी शिवसेना एनडीएतून बाहेर पडत नाही तोवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकत नाही असं आघाडीने सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी ७.३० पर्यंत शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिली आहे. मात्र राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतलं पाहिजे. सरकार बनविणं आमचे कर्तव्य, जास्त मुदत मिळणे गरजेचे आहे. मात्र राज्याला राष्ट्रपती राजवटीपर्यंत ढकलायचं हे षडयंत्र रचलं जात आहे. ज्या घटनात्मक तरतूदीनुसार काम करता येईल ते करणार आहोत. आमच्या भूमिका राज्यपालांकडे मांडणार आहोत. शिवसेनेवर राज्यपालांनी सरकार बनविण्याची जबाबदारी निमंत्रण दिलं. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सरकार बसविण्याचा प्रयत्न करणार आहोत असं संजय राऊतांनी सांगितले आहे.
तर दिल्लीत कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. पुढील चर्चा राज्यातील नेत्यांसोबत होणार आहे. ४ वाजता बैठक होणार आहे. राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेणार आहे. त्यानंतर राज्यात कोणती भूमिका घेणार याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस हात देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीही शिवसेनेला साथ देणार असल्याची माहिती आहे. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेटही होणार आहे त्यामुळे भविष्यात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत राज्यात सत्तास्थापन करणार आहे हे नक्की झाल्याचं राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.