नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते उद्या (सोमवार) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर या भेटीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते.विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झालेले नाही. भाजपा व शिवसेनेमध्ये खातेवाटपावरून अद्यापही समेट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सोनिया गांधी यांच्या भेटीला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे. शरद पवार आज (रविवार) सायंकाळी दिल्लीत दाखल झाले.विधानसभा निवडणुकीचे जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची पहिल्यांदाच दिल्लीत येत आहे. यापूर्वी त्यांनी दूरध्वनीवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत सेनेला पाठिंबा देण्याच्या संदर्भात पक्षाची कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नाही. सेनेला पाठिंबा देण्याच्या संदर्भात शरद पवारांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात पक्षातील नेत्यांच्या मतापेक्षा शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व किंवा विश्वासार्ह मानत असल्याचे समजते. या भेटीनंतरच काँग्रेस व राष्ट्रवादीची सेनेला पाठिंबा देण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; सेनेला पाठिंबा देण्यावरून पवारांची भूमिका निर्णायक?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 5:18 PM