शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 02:01 PM2024-11-13T14:01:20+5:302024-11-13T14:02:19+5:30
अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखावे याबाबत शरद पवार गटाकडून याचिका दाखल केली होती.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हाचा वाद अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याबाबत आज कोर्टात सुनावणी घेण्यात आली. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला ३६ तासांत वृत्तपत्रांमध्ये विशेषत: मराठी वृत्तपत्रात एक डिस्क्लेमर जारी करण्याचे आदेश दिले होते. आजच्या सुनावणीत कोर्टाच्या आदेशानुसार दिलेल्या जाहिरातीबाबत अजित पवार गटाच्या वकिलांनी कोर्टाला माहिती दिली. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर आज सुनावणी केली.
आजच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मतदारांवर परिणाम होत अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला त्यावर न्याय. सूर्यकांत यांनी आम्ही मतदारांवर परिणाम टाकू शकतो याचा आम्हाला अंदाज नाही. आम्ही कायद्यानुसार काम करत आहोत असं म्हटलं. कोर्टात सादर केलेल्या जाहिरातीचे पेपर पाहताना न्याय. सूर्यकांत यांनी मजेशीरपणे तुम्ही छापलेले एक डिस्क्लेमर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बातमीखाली छापले आहे जे खूप प्रभावशाली वाटते अशी टीप्पणी केली.
आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणुकीच्या साहित्यात शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका असे तोंडी आदेश दिलेत. त्याशिवाय तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं, अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील कुठल्याही सदस्याने शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नयेत असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितले. अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखावे याबाबत शरद पवार गटाकडून याचिका दाखल केली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्हाबाबत ते न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात देण्याचे आदेश अजित पवार गटाला दिले होते.
शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला. अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी हे शरद पवारांचे फोटो लावल्याचे निदर्शनास आणले. त्यावर अजित पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी आरोप फेटाळून लावले, हे साहित्य फेक आहे असं सांगितल त्यावर सिंघवी यांनी प्रत्युत्तर दिले की, हा व्हिडिओ अमोल मिटकरी यांच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातील लोकांना फुटीबद्दल माहिती नाही असं वाटतं का, सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांवर प्रभाव पडेल का असा सवाल न्याय. सूर्यकांत यांनी सिंघवी यांना विचारला. मात्र अजित पवार गटाकडून अद्यापही मोठ्या पवारांसोबत काही संबंध आहेत असा प्रयत्न केला जात आहे. ३६ जागांवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या उमेदवारात थेट लढत असल्याचं सिंघवींनी कोर्टाला सांगितले.