मुंबई - अनेक अडथळे पार करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. आता गुरुवारी संध्याकाळी या आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवाजी पार्कवर होणार हा शपथविधी अविस्मरणीय होण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तसेच गुरुवारी होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी त्यांना निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.
तसेच उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधीची अधिकृत निमंत्रणपत्रिकाही पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले. निमंत्रण देण्यासाठी आज रात्री उशिरा आदित्य ठाकरे दिल्लीला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.