नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा इतक्या दिवसांपासून सुरु असलेला तिढा दिल्लीत सुटण्याची चिन्हे दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात शिवसेना मुख्यमंत्री बसविण्याची तयारी करत आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधी यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर सोनिया गांधी यांनी होकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतचं वृत्त आजतक या चॅनेलने दिलं आहे.
दिल्लीत आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. राष्ट्रवादीसोबत एकत्रित बैठकीआधी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांची बैठक होत आहे. तत्पूर्वी ही माहिती समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचं कळतंय.
त्याशिवाय आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात सरकारस्थापनेच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर झाली असून, सरकारस्थापनेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच-सहा दिवसात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. मात्र, आता पवारांनीच शिवसेनेसोबत बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलंय.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच काँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.
त्यानंतर, शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत. “काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं त्यांना विचारल्यावर त्यांनी उपरोधिकात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं.