नवी दिल्ली : महाराष्ट्रात १२ नोव्हेंबर रोजी लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्याची अधिसूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी पहाटे ५.४७ वाजता जारी केली. राष्ट्रपती राजवट लागू करण्याप्रमाणेच ती उठवितानाही केंद्रीय मंत्रिमंडळाने तशी शिफारस करणे आवश्यक असते. निर्णय तातडीने घेणे गरजेचे असल्याने नियमानुसार नोटीस देऊन सर्व मंत्रिमंडळाची बैठक घेणे शक्य नव्हते.पण राष्ट्रपती राजवट उठविल्याशिवाय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देणे राज्यपालांना शक्य नव्हते. त्यामुळे ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट उठविल्यानंतर दोन तासांमध्येच दोघांचा शपथविधी करण्यात आला.राष्ट्रपती राजवट उठविण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर केली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बैठक घेणे शक्य नसल्यानेच केंद्र सरकारच्या कामकाजविषयक नियमावलीतील नियम १२ अन्वये पंतप्रधानांना असलेल्या विशेषाधिकाराचा आधार घेण्यात आला. या नियमानुसार विशेष परिस्थितीत नियम पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा किंवा त्यात फरबदल करण्याचा विशेषाधिकार पंतप्रधानांना आहे.
Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी नियमाला अपवाद केला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:27 AM