नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेवर दिल्लीतील हालचालींना वेग आलेला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सत्रासाठी राज्यातील अनेक नेते दिल्लीत आहे. त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठीमुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेने भाजपासोबत जुळवून घ्यावं असं रामदास आठवलेंनी सांगितले.
याबाबत रामदास आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी संजय राऊतांना भेटलो, सरकारस्थापनेबाबत भाजपाला ३ वर्ष मुख्यमंत्री आणि शिवसेनेनं २ वर्ष मुख्यमंत्रिपद घ्यावं असा सल्ला त्यांना दिला. त्यावर जर या फॉर्म्युल्यावर भाजपाची सहमती असेल तर शिवसेना विचार करेल असं ते म्हणाले. याबाबत मी भाजपाशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले.
मात्र आठवलेंच्या म्हणण्यानुसार जर भाजपाने मुख्यमंत्रिपद देऊ केलं तर शिवसेना विचार करेल त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीची चर्चा जरी सुरु असली तरी शिवसेनेनं अद्याप भाजपासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावलेली नाही. अशातच आज संजय राऊत यांनी एनडीएतून शिवसेना बाहेर पडली म्हणजे युपीएत जाणार नाही असं विधानही केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात यांच्यात यापुढेही बोलणी होऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, शरद पवारांनी संसदेच्या सत्रापूर्वी माध्यमांशी केलेल्या संवादामध्ये केलेल्या विधानवरुनही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत.“काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे असं त्यांनी सांगितले त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
त्याचसोबत राऊतांनी संसदेत भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा नेते स्वत:ला भगवान (देव) समजत आहेत. म्हणूनच, आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. कभी कभी लगता है, अपुनही भगवान है... असा त्यांचा समज झाला आहे. मात्र, देशात मोठ-मोठे बादशहा येऊन गेले, पण लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणीच्या मालकीची संपत्ती नाही. त्यामुळे आम्हाला न विचारत घेता, शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढलेच कसे? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.