दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षाचे पडसाद दिल्लीतही उमटत आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची जागा विरोधी बाकांवर केली आहे. केंद्र सरकारमधून शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. तसेच एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नाही. अरविंद सावंत यांचा कारभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून दिल्लीत सुरु होत आहे. तत्पूर्वी एनडीएची बैठक आज पार पडली. गेल्या ३० वर्षापासून न चुकता या बैठकीचं निमंत्रण शिवसेनेला देण्यात येत होतं. मात्र राज्यात शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केल्याचे परिणाम दिल्लीत दिसू लागले आहेत. केंद्र सरकारमधून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरुन शिवसेना खासदारांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे. त्याचसोबत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सावंत यांना आता पहिल्या रांगेतून थेट तिसऱ्या रांगेत बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, शिवसेना एनडीए बैठकीत आली नाही, त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत गेली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे असल्याचं त्यांनी सांगितले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
भाजपाने महाराष्ट्रात युती संपल्याची अद्याप घोषणा झाली नाही. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत विरूद्ध भाजपाध्यक्ष अमित शहा अशी जुगलबंदी रंगली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. युती नसली तरी तशी घोषणाही नाही. केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेला रालोआ बैठकीचे निमंत्रण न पाठवून भाजपनेदेखील 'युती तुटली' असाच संदेश दिला होता. मात्र शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागा बदलण्यात आली आहे तसेच याबाबत संसदीय कार्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणाच केली आहे.