Maharashtra Government: डिसेंबर उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 09:51 AM2019-11-20T09:51:00+5:302019-11-20T11:20:46+5:30
महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी दिल्ली - महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारस्थापनेच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर झाली असून, सरकारस्थापनेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच-सहा दिवसात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली .
राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की,’’सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपा राज्यात सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे इतर पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील सरकारस्थापनेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच-सहा दिवसात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल.
Sanjay Raut, Shiv Sena: The process to form the government will complete in next 5-6 days and a popular & strong government will be formed in Maharashtra before December. The process is going on. pic.twitter.com/cyQKTL85Fm
— ANI (@ANI) November 20, 2019
यावेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात होऊ घातलेल्या भेटीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘’नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची भेट घेणे गैर आहे का. शरद पवार हे रा्ज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोदींची भेट घेणार आहेत. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.’’
‘’तसेच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा ह्या केवळ निव्वळ अफवा आहेत. मी काल अजित पवार यांच्याशी सविस्तर बोललो त्यावेळी या विषयावर चर्चा झाली होती. केवळ शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत,’’असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.