नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद आहेत. या पक्षाने लोकशाहीचे धिंडवडे काढले असून, तीन पक्षांच्या आघाडीने सरकार स्थापन करू नये म्हणून अनेक अडथळेही आणले, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केली आहे.काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या इशाऱ्यावरच काम केले. भाजपच्या अहंकारामुळेच त्यांची शिवसेनेबरोबरची युती टिकू शकली नाही.तीन पक्षांच्या आघाडीच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यांविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा पुरते उघडे पडले आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी भाजपचे वाईट मनसुबे हाणून पाडेल, असा दावा करून सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी सरकारने सभ्यतेला सोडचिठ्ठी दिलेली आहे. देशासमोरील गंभीर समस्या कशा सोडवाव्यात याची या सरकारला जाण नाही. आर्थिक पेचप्रसंगाने गंभीर स्वरूप धारण केले असून, त्यामुळे देशाच्या विकासावरही परिणाम झाला आहे.बेकारी वाढत असून, गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. शेतकरी, व्यापारी, लघु तसेच मध्यम उद्योजक चिंताक्रांत आहेत. देशाची निर्यात घटली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना रोजचे आयुष्य जगणे त्रासदायक झाले आहे. दुस-या बाजूला मोदी सरकार देशाच्या विकासाबाबत आकड्यांचा फसवा खेळ करण्यात गुंतले आहे. वास्तव दर्शविणारी आकडेवारी प्रसिद्ध करण्यास हे सरकार तयार नाही, असेही त्या म्हणाल्या.उद्योगपतींना उपकृत करण्याचा डावसोनिया गांधी यांनी सांगितले की, काही सार्वजनिक उपक्रम आपल्या मर्जीतील उद्योगपतींच्या घशात घालण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचसाठी या उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. देशातील राज्यघटना, लोकशाही वाचविण्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस नेहमीच लढा देत राहील, असेही त्यांनी सांगितले.
Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 4:56 AM