नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची चिन्हं अखेर दिसू लागली आहेत. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची 'महाविकासआघाडी' राज्यात सरकार स्थापन करेल, हे आता जवळपास निश्चित झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती या दोन्ही पक्षांकडून आज देण्यात आली. त्यानंतर आता ते आपल्या मित्रांशी आणि मग शिवसेनेशी अंतिम चर्चा करतील. हे भिन्न प्रवृत्तीच्या आणि विचारधारांच्या पक्षांचं सरकार पाच वर्षं टिकेल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतानाच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. पाचच काय, हे सरकार १५ वर्षंही टिकू शकतं, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चा फलदायी ठरत असून सकारात्मक दृष्टीने पुढे गेली आहे. उद्या आम्ही आमच्या मित्रपक्षांना भेटू आणि मग आवश्यक आणि उचित पावलं उचलली जातील. काही जणांना या चर्चेच्या फेऱ्या कशासाठी असा प्रश्न पडलाय. पण, जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने ठरलं आणि सरकार भक्कम पायावर उभं राहिलं तर पाचच काय १५ वर्षं टिकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
समन्वय महत्त्वाचा!
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता शिवसेना हा नवा मित्र आमच्याशी जोडला जातोय. त्यामुळे समन्वय अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्यादृष्टीने योग्य काळजी घेतली जाईल, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीमधील मंत्री आणि पक्षांचे नेते यांची एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते, असं सूत्रांकडून समजतं.
किमान समान कार्यक्रमाबद्दल फार काही बोलणं जयंत पाटील यांनी टाळलं. महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करून, सरकार चालवताना महत्त्वाच्या ठरतील अशा गोष्टींचा या किमान समान कार्यक्रमात समावेश असेल. या सर्व गोष्टी सगळ्यांचं ठरल्यावर एकत्रितपणे जाहीर करू, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवं?
शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे फक्त दोनच आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, असा सूर कार्यकर्त्यांमधून आणि काही नेत्यांमधून ऐकू येतोय. मात्र, या विषयालाही जयंत पाटील यांनी बगल दिली. अशा गोष्टींवर आत्ता चर्चा करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेगळी योग्य स्तरावर त्यासंबंधी विचार होईल, असं त्यांनी सूचित केलं.
महत्त्वाच्या राजकीय बातम्याः
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का?
भाजपाला जमेना, महाविकासआघाडीचे काही ठरेना, अखेर राज्यपालांनीचे केले सत्ताधिकारांचे वाटप
अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी!
'महाशिवआघाडी'मधून 'शिव' हटवणाऱ्या सेनेला भाजपानं काढला चिमटा!