दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याने केंद्र सरकारमधून शिवसेना बाहेर पडली आहे. शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलविली होती. मात्र या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसणार आहेत अशी अधिकृत घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, शिवसेना एनडीए बैठकीत आली नाही, त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत गेली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे असल्याचं त्यांनी सांगितले.
लोकसभेत भाजपाला संपूर्ण बहुमत आहे मात्र राज्यसभेत भाजपाला इतर पक्षांची मदतीची गरज असते. त्यामुळे शिवसेनेचा विरोध भाजपासाठी कठीण जाणार आहे. सर्वपक्षीय बैठकीसाठी गटनेते विनायक राऊत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या १८ आहे. एनडीएतील दोन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध सरकारसाठी डोकेदुखी ठरु शकतो.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
भाजपाने महाराष्ट्रात युती संपल्याची अद्याप घोषणा झाली नाही. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत विरूद्ध भाजपाध्यक्ष अमित शहा अशी जुगलबंदी रंगली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. युती नसली तरी तशी घोषणाही नाही. केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेला रालोआ बैठकीचे निमंत्रण न पाठवून भाजपनेदेखील 'युती तुटली' असाच संदेश दिला होता. मात्र शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागा बदलण्यात आली आहे तसेच याबाबत संसदीय कार्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणाच केली आहे.