Maharashtra Government: 'महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची; पेढ्याची ऑर्डर दिली असं समजा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 08:56 PM2019-11-20T20:56:44+5:302019-11-20T20:57:12+5:30
तसेच तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार येणार नाही, या तीन पक्षांच्या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल.
नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत घडामोडी घडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची जवळपास ३ तासांहून जास्त काळ बैठक सुरु आहे. मात्र याच दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली असं समजा अशा सूचक विधान त्यांनी केलं आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरु असताना संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या निवासस्थानाबाहेर राऊत मुलीसोबत फिरत असल्याचं दिसलं. रिलॅक्स मूडमध्ये राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी, या राज्यात लोकप्रिय सरकार यावं, सर्व घटनेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष ठेवून आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं होतं गोड बातमी देऊ पण त्यांना ती बातमी देता आली नाही, त्यामुळे महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठक सुरु असताना प्रतिक्रिया दिली.
तसेच तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार येणार नाही, या तीन पक्षांच्या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करावी लागेल. दिल्लीत या घडामोडी घडत आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी जाऊ शकतो. आघाडीच्या बैठकीत काय झालं. याची माहिती उद्धव ठाकरेंना द्यावी लागेल. ही चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाने राज्याच्या हितासाठी अशा आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मान्यता सोनिया गांधी यांनी दिली आहे. सरकार स्थापन होताना प्रमुख नेत्यांशी चर्चा होते. काँग्रेस प्रमुख नेतेच या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री कोण होणार याची माहिती काँग्रेसला दिली आहे. शिवतिर्थावर शपथविधी होईल तेव्हा महाराष्ट्राला कळेल मुख्यमंत्री कोण होणार आहे. पण उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रे हातात घ्यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे असं संजय राऊतांनी सांगितले.
'लवकरच महाराष्ट्रात स्थिर अन् लोकाभिमुख सरकार स्थापन होणार' @NCPspeaks@ShivSena@INCMaharashtra#MaharastraPoliticalCrisishttps://t.co/LOZsR9Q6b9
— Lokmat (@MiLOKMAT) November 20, 2019
ही बैठक सुरु असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बाहेर येऊन संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या २१ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दिर्घवेळ चर्चा झाली. सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्तित्वात येईल. पुढील २-३ दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आणखी काही गोष्टींवर चर्चा व्हायची बाकी आहे. ती लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत पर्यायी सरकार देईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.