भोपाळ : भाजपने महाराष्ट्रात राज्यघटना पायदळी तुडवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असून, त्याविरोधात शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केले.ते म्हणाले की, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आपली मुंबई व महाराष्ट्रात असलेली ताकद आता दाखवून द्यायला हवी. असे आंदोलन शिवसेनेने केले, तर काँग्रेसही त्यात सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांनी, होय, नक्कीच अशा आंदोलनात काँग्रेसचा सहभाग असेल, असे उत्तर दिग्विजय सिंह म्हणाले यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही आणि एकटे अजित पवारच भाजपसोबत गेले आहेत, अशी माझी माहिती आहे, असे सांगताना ते म्हणाले की ज्यांच्यावर भाजपचे नेते सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते, ते अजित पवारच आता भाजपला जवळचे वाटू लागले आहेत. ज्याप्रकारे राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, तो प्रकार घटनाबा'च आहे.याच भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. पण आमच्याकडे बहुमताइतके संख्याबळ नसल्याचे सांगून भाजपने सरकार स्थापनेस नकार दिला होता. आता त्यांच्याकडे बहुमत आहे, असे दाखवणारा कोणता पुरावा भाजपने राज्यपालांना सादर केला, हेही राज्यपालांनी जाहीर करावे, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली. (वृत्तसंस्था)किती जणांची पत्रे मिळाली?शिवसेनेकडे सर्व आमदारांची सही असलेली पत्रे मागणाऱ्या राज्यपालांना राष्ट्रवादीच्या किती आमदारांची सही असलेली पत्रे मिळाली आहेत, हे जनतेला समजणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले की, मुळात बहुमत हे विधानसभेत सिद्ध करायचे असते, राज्यपालांनी त्याची विचारणा करायची नसते, असे सर्वोच्च न्यायालय आणि सरकारिया आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यपालांनी शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराच्या सही मागण्याचे कारण काय होते, हे त्यांनी सांगावे.
Maharashtra Government:शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करावे - दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:53 AM