नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपा आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही मागणी केली परंतु भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास असहमती दर्शविली. याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पक्षाला देत असणाऱ्या वागणुकीवर भाष्य करत केंद्र सरकारमधून बाहेर पडले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटकपक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण दिलं नाही. इतकचं काय तर शिवसेनेच्या खासदारांची जागा सत्ताधारी बाकांवर विरोधी बाकांवर करण्यात आली. याच घडामोडीतून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचीही सभागृहात बसण्याची जागा बदलली. याबाबत नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं.
या पत्रात संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखविण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय एखाद्याने घेतला असावा. तसेच एनडीएतून शिवसेनेला हटविण्याबाबत औपचारिक घोषणा नसल्याने असं अनाधिकृत पावलं का उचचली याबाबत मला काहीच समजलं नाही. हे कृत्य सभागृहाच्या सन्मानाशी निगडीत आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, आम्हाला १,२,३ या रांगेत आसानव्यवस्था करुन सभागृहाचा सन्मान ठेवावा असं राऊतांनी सांगितले.
यापूर्वीही शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले. भाजपाच्या धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई, तशी ही अतिघाई या मंडळींना नडणार आहे. नाही ती नडलीच आहे. शिवनेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सूत जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा प्रल्हाद जोशींनी केली. मात्र ही घोषणा करणाऱ्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म धर्म माहित नाहीत .एनडीएच्या बाळंतपणाच्या वेदना शिवसेने अनुभवल्या आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात फार महत्त्व नव्हते तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल घालण्याचे काम शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेला बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.