नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास 3 तासांहून जास्त ही बैठक सुरु आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. आज आणि उद्या आणखी चर्चा होईल. महाआघाडीकडून शुक्रवारी सत्ता स्थापनेची अंतिम घोषणा केली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितले.
या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले गेल्या २१ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दिर्घवेळ चर्चा झाली. सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्तित्वात येईल. पुढील २-३ दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आणखी काही गोष्टींवर चर्चा व्हायची बाकी आहे. ती लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत पर्यायी सरकार देईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
या बैठकीला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक हे उपस्थित होते, तर काँग्रेसकडून के.सी वेणुगोपाळ, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान इ. नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवास्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी, या राज्यात लोकप्रिय सरकार यावं, सर्व घटनेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष ठेवून आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं होतं गोड बातमी देऊ पण त्यांना ती बातमी देता आली नाही, त्यामुळे महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठक सुरु असताना प्रतिक्रिया दिली.
तत्पूर्वी आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात सरकारस्थापनेच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर झाली असून, सरकारस्थापनेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच-सहा दिवसात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. मात्र, आता पवारांनीच शिवसेनेसोबत बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.