नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर दिल्लीत नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते दिल्लीत डेरेदाखल आहेत तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही बैठक झाली आहे. यानंतर उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत नवाब मलिक म्हणाले की, राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यावर आमचं एकमत आहे. त्यासाठी उद्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमची चर्चा होणार आहे. तसेच शिवसेनेचा सन्मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्याचसोबत मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात भांडणं होणार नाहीत असंही मलिकांनी सांगितले.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येतील म्हणून माध्यमांनी त्यांना महाशिवआघाडी असं नावं दिलं आहे. पण हे बरोबर नाही. कारण आतापर्यंत देशात जिथे कुठे आघाडी झाली तिथे कुठल्या एका पक्षाचं नाव कधी त्यात आलं नाही. पुलोद, संयुक्त पुरोगामी आघाडी ,लोकशाही आघाडी अशी नावं दिली असल्याचं सांगत महाशिवआघाडी या नावावर नवाब मलिकांनी आक्षेप घेतला.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पवारांच्या विधानानंतर सावध पवित्रा घेतला आहे. थोरात म्हणाले की, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु आहेत, ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो राज्याच्या हिताचा असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाल्यानंतर पुढील टप्पा सुरु होईल. भाजपाला दूर ठेवलं पाहिजे पण कशापद्धतीने यावर चर्चा सुरु आहे. मित्रपक्षांशी बोलण्यास वेळ जाणार आहे. निर्णय दिल्लीत होईल. जो निर्णय होईल तो मान्य राहणार आहे असं थोरातांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र सोमवारी झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं सांगितल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या होत्या.