नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी गुढ झाला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या महाशिवआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत शिवसेना आणि सत्तास्थापना या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं पवारांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं सांगितल्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला.
यानंतर पत्रकारांनी राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक झाली यात कॉमन मिनिमम प्रॉग्रामवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं मात्र पवारांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक् झाले. काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम' करू, राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून ते भेटले होते असा दावा शरद पवारांनी केला त्यामुळे एकसूत्री कार्यक्रम बैठकीत ठरला आहे, मसूदा तयार करण्यात आला आहे त्यानंतर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मसुद्यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात आलं होतं. त्यावर शरद पवारांच्या या विधानामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच सोनिया गांधी यांच्यासोबत बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संदर्भात बोलणी झाली. शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.
आघाडीच्या मित्रपक्षांना विचारात घ्यावं लागेलतसेच कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले.