नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत मोठ्या हालचाली होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चांनी उधाण आलं आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी याचं उत्तर भाजपालाच विचारा असं सांगितलं आहे.
माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रात अस्थिरता आहे, पंतप्रधानांना चिंता असेल त्यावर कदाचित हे नेते बोलले असतील. केंद्र सरकारही महाराष्ट्राच्या पाठिशी उभं राहिलं. पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही, तर देशाचे आहेत. हे राज्य निर्माण होईल तेव्हा त्यांना दिल्लीचा आशीर्वाद असेल असं सांगत अमित शहांनी वारंवार मोदींची भेट घ्यावी असं ते म्हणाले,
अमित शहा आणि नरेंद्र मोदी भेटीवर राऊतांनी भाष्य केलं. शहा- मोदी यांची वारंवार भेट व्हावी. गृहमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाली त्यात नवल नाही, अनेक गृहखात्याशी बिलं असतील तर भेटले असतील. संसदेचं अधिवेशन सुरु असलेल्यांनी ते भेटले असतील असं संजय राऊतांनी सांगितले.
तसेच १०० टक्के महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार येईल. महत्वाच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. निर्णय घेतले जात आहे. निश्चितच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनेल. काँग्रेस-राष्ट्रवादीशी व्यवस्थित संवाद झालेला आहे. संध्याकाळी शरद पवारांची छोटी बैठक होऊ शकते असा दावा संजय राऊत यांनी केला.
त्याचसोबत राज्यसभेत बदललेल्या आसनव्यवस्थेवरुन राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. आम्ही कुठल्याही बाकावर असलो तरी आमचा आवाज सभापतींपर्यंत, देशात पोहचतो. नियमांचे उल्लंघन झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासाठी राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आपण पंतप्रधान मोदींकडे मांडला. तसेच या नुकसानीकडे मोदींचे लक्ष वेधल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवरून सांगितले. मात्र या भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.