वाराणसी - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेतून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी चौबे यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनता सर्व पाहत आहे. सत्य काय आहे हे त्यांना समजतं. आज नाही तर उद्या याचे गंभीर परिणाम शिवसेनेला भोगावे लागणार असा इशारा अश्विनी चौबे यांनी दिला आहे.
एका कार्यक्रमासाठी ते वाराणसीला आले होते, त्यावेळी माध्यमाशी बोलताना अश्विनी चौबे म्हणाले की, एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेने जो कौल दिला तो शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीला मिळाला होता. शिवसेनेने महायुतीच्या धर्माचं पालन करणं गरजेचे होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेच्या हिंदुत्व मुद्द्यावर बोलताना कोण कोणाला शिकविणार हे सर्व माहित आहे. सत्तेच्या लालसापोटी अशाप्रकारे भाजपाने कधीही पावलं उचलली नाहीत असंही अश्विनी चौबे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्यापेक्षा भाजपसोबत एकत्र येवून राज्यात सरकार स्थापन करावे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घेवून एकत्र सरकार चालवावे. मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपने दीड वर्षासाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊन तडजोड करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
दिल्लीत रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून शिवसेना भाजप यांना एकत्र आणून सरकार बनविण्याबाबत विषय मांडला असता त्यांनी सर्व सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची नवी दिल्लीत रामदास आठवले यांची भेट घेवून शिवसेना भाजपने एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना भाजपमधील दुरावा संपवून त्यांना एकत्र आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत मध्यस्थी करण्याचा आज प्रयत्न केला.