नवी दिल्लीः महाराष्ट्रातील निवडणुकीचं चित्र जवळपास समोर आलेलं आहे. भाजपाला 105 जागा मिळाल्या असून, शिवसेना 56, काँग्रेस 52 आणि राष्ट्रवादी 54 जागांवर विजयी झाली आहे. त्यानंतर शिवसेना आणि भाजपा मिळून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे आता महायुतीतील मित्र पक्षांनाही मंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाइंचे रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपाकडे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. अमित शाह लवकरच मुंबईला येणार आहेत, त्यानंतर ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील. अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीतच नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यायचं हे ठरवलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचवेळी ‘अब की बार 220 के पार’च्या महासंकल्पाला मतदारांनी रोखले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे ही निवडणूक लढवून आपल्या पक्षाला भाजप-सेनेपाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवून दिल्या.काँग्रेसने आधीच्या जागांमध्ये वाढ करीत महायुतीला धक्का दिला आहे. निकालानंतर भाजप-शिवसेनेने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. जवळपास 15 बंडखोर/अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सत्तास्थापनेची जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले. सत्तेसाठी आम्ही काहीही वेडंवाकडं करणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता फेटाळली असून महायुतीचेच सरकार येणार असे स्पष्ट संकेत दिले. त्याचवेळी सत्तेत ‘फिप्टी-फिप्टी’चा वाटा राहील, अशी भूमिका घेत भाजपवर दबावही आणला आहे. ‘दुसरे, तिसरे काहीही घडणार नाही, महायुतीचीच सत्ता येणार’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.