Maharashtra Government: ''अजित पवार एकटेच पडतील, सुप्रिया सुळे होतील पवारांच्या उत्तराधिकारी''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 09:14 AM2019-11-24T09:14:57+5:302019-11-24T09:15:51+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
नवी दिल्लीः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारचा भूकंपच आणला होता. शरद पवारांनी अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरून हटवले. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं भाजपा सराकरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत सांगितलं की, या राजकीय चढाओढीत अजित पवार एकटे पडणार आहेत. राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार हे शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार हे एकटेच राहतील. तसेच पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांची समस्याही सुटली आहे. सुप्रियाताईंना शुभेच्छा!!, दिग्विजय सिंह यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये शरद पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांवर वाद सुरू होता. त्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
तत्पूर्वी पक्षाचा विधिमंडळ सभासद किंवा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपासोबत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते. इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.NCP के ५४ में से ५३ शरद पवार जी के साथ रहेंगे। अजीत पवार अकेले रह जायेंगे। शरद पवार के उत्तराधिकारी की समस्या भी हल हो गयी। बधाई सुप्रिया!!
— digvijaya singh (@digvijaya_28) November 24, 2019
काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला होता. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांशीही संवाद साधला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, सुनील तटकरे हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अजित पवारांसोबत कोणकोण आहेत, याची खातरजमा करून त्या प्रत्येकाशी स्वत: पवारांनी संपर्क साधला.