नवी दिल्लीः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारचा भूकंपच आणला होता. शरद पवारांनी अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरून हटवले. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं भाजपा सराकरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत सांगितलं की, या राजकीय चढाओढीत अजित पवार एकटे पडणार आहेत. राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार हे शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार हे एकटेच राहतील. तसेच पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांची समस्याही सुटली आहे. सुप्रियाताईंना शुभेच्छा!!, दिग्विजय सिंह यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये शरद पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांवर वाद सुरू होता. त्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Maharashtra Government: ''अजित पवार एकटेच पडतील, सुप्रिया सुळे होतील पवारांच्या उत्तराधिकारी''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 9:14 AM