मुंबई - भाजपाने आमचा विश्वासघात केला, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला खोटं ठरवत आहेत, असे म्हणत शिवसेनेनं भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला निवडणुकांपूर्वीच ठरल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकांवेळी झालेल्या चर्चेत जागा-वाटपासंदर्भात 50-50 फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यामध्ये, मुख्यमंत्रीपदाचंही ठरल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाबाबतच विधान खोट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, नितीन गडकरी यांनीही अमित शहांशी बोलणी झाली होती, असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्टीकरण दिलंय. मात्र, मला खोट ठरवणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या सरकार स्थापनेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी महाआघाडीला सोबत घेऊन सरकार बनविण्याचा प्लॅन आखला आहे. त्यामुळे शिवसेनेवर भाजपा समर्थकांकडून टीका होत आहे. सध्या सोशल मीडियावर अमित शहांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, त्यांनीही असा कुठलाच फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केलंय.
अमित शहा यांनी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला राज्यातील निवडणुकांच्या 7 दिवस अगोदर म्हणजे 13 ऑक्टोबर 2019 रोजी मुलाखत दिली होती. त्यामध्ये, शिवसेनेसोबत 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला असून मुख्यमंत्रीपद हे भाजपाकडेच असणार असल्याचे म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी वाटून घेणार का? असा प्रश्न मुलाखतकार पत्रकाराने विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, 5 वर्ष आमचाच मुख्यमंत्री राहिलं आणि तेही देवेंद्र फडणवीसच असतील, असे अमित शहांनी स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेनं राज्यात घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या अमित शहांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ :- टीप - भाजपाने अपलोड केलेल्या या मुलाखत व्हिडीओतील 38.25 मिनिटापासून ते 39.15 या 50 सेकंदाच्या कालावधीतील अमित शहा आणि मुलाखत घेणाऱ्या पत्रकारामधील हा संवाद आहे.